Creative story writing with '5 images'

in WORLD OF XPILAR3 months ago (edited)

Hello, everyone,
I challenged myself to create a story using any 5 images I shot.
I tried to be as creative and fluent with the images narratively as I could.
Writing in English is difficult for me, so I wrote the story in my native language, Marathi.
I hope you can translate it and understand its gist.

WhatsApp Image 2024-09-20 at 3.23.37 PM (4).jpeg

रुहानी ने जेव्हा दारातून शेवटचं घराकडे पाहिलं तेंव्हा त्या समोर पसरलेल्या नीटनेटक्या, स्वच्छ नि टापटिपीच्या जगात तिचा घुसमटलेला जीव अजूनच जडावला. घरातल्या सगळ्या वस्तू जिथल्या तिथंच होत्या, जणू‌काही शिक्षा दिल्यासारख्या, आणि रुहानी सारख्याच थिजलेल्या, मोकळा श्वास घेण्याच्या जणू इच्छेचाही आता जडपणा येऊन जडावलेल्या ... सवयीचं जगपण एक सुरक्षेचं खोटं का असेना कवच देत असतंच. पण आता कुठे त्या जीवाला स्वतःच्या अवकाशात मनासारखा मोकळा श्वास घ्यायला मिळेल या अपेक्षेनं तिला पुढचं पाऊल टाकायला मिळालेलं बळ पुरेसं होतं.

अब्बू आणि अम्मी कॉलेजला त्याच त्याच मुलांना तेच तेच शिकवण्याच्या रोजच्या पाट्या टाकायच्या कामावर न चुकता हजर होते. त्याच गर्दीतला एक चेहरा बनलेल्या रुहानीनं बरं वाटत नाही म्हणून सुट्टी घेतली होती. तिचा निर्णय केव्हाच पक्का झाला होता. 'पंखात बळ येतं तेव्हाच पिल्लानी भरारी घ्यावी, नाहीतर त्यांचे स्वतःच्या पायावरही उभं राहणं अवघड होवून बसतं. निसर्गाचा नियम आहे तसा' मार्क म्हणायचा...

दरवाजा बंद करताना काहीशा भीतीनं, थोडंसं आनंदानं, काहीशा दुःखानं जणू तिनं त्या काळाच्या मोठ्या पडद्यावर शेवटचा हात फिरवला. लहानपण, बालपण, वयात येणं, खेळणं, मजा करणं, शरीराचं फुलणं, मनाचं बहरणं, बंधनं येत जाणं, वाद होणं, आणि मग सगळं सुरळीत चालल्यासारखं शांत होणं हा सगळं पट तिच्या डोळ्यसमोरून भिरभिरत एखाद्या भरधाव चाललेल्या रेल्वेसारखा निघून गेला.

WhatsApp Image 2024-09-20 at 3.23.37 PM (3).jpeg

ते सगळं मनात साठवत, आठवत, काही रिकामं करत एक एक पायऱ्या ती Parking lot मधे येवून पोहचली. लिफ्ट बंद असल्यानं एक एक पायरी उतरता उतरता तिचा निर्धार अजूनच पक्का होत गेला. अब्बू अमीन लावलेल्या सवयीनुसार ती वेळेच्या आधीच येऊन पोहचली होती. मार्क अजून यायचा होता. तिथूनच एका त्याच्या मित्राच्या बाईकवर दोघं निघणार होते. तो निघाला की नाही याची खात्री करून घ्यायला फोन करावाअसं तिला वाटून गेलं, पण निघण्याधीच बोलणं झालं होतं म्हणून तिनं तो विचार सोडून दिला. तिच्या foreign language department मध्ये नुकताच रुजू झालेला German भाषेचा professor. त्याचं बोलणं , शिकवणं , बिनधास्त असणं हे आठवून तिला त्याची अजूनच हुरहूर जाणवू लागली. कधी कधी 'वाट पाहणं' इतक जीवघेणं असतं कि ती पाहता पाहता तो काळच संपून जाईल आणि आपण त्यात विलिन होवून जावू असं रुहानीला वाटून गेलं...

जेव्हा नात्यामध्ये तुम्ही 'other half' असं म्हणता तेंव्हा तो त्या योग्य अर्थाने कोपरा भरून त्या अपुर्णत्वाच्या भावनेला पूर्णत्व मिळेपर्यंत ती जीवघेणी तगमग seesaw च्या खेळासारखी अखंड झुलवत राहते. जगातला प्रत्येक प्रेमिकांच्या आयुष्यात येणारी ती अटळ Phase ती पहिल्यांदाच अनुभवत होती.
थोडंसं बरं वाटावं म्हणून तिनं त्याच्याबरोबर अनुभवलेले काही क्षण आठवायचा प्रयत्न केला आणि वारंवार शांत वाटणाऱ्या समुद्रातून अचानक एखादी वर झेपावणारी मासळी चमकून उठावी तशी एक प्रतिमा तीच्या डोळयापुढे तरळून गेली.

WhatsApp Image 2024-09-20 at 3.23.37 PM.jpeg

अशाच एका अम्लान क्षणी त्याच्या hostel च्या रूमवर शरीर-मन विरघळून टाकणाऱ्या जिव्हाळयानंतर बेडवर झोपलेला तो! शांत आणि निश्चल!
मागच्या खिडकीतून झिरपणाऱ्या प्रकाशातू‌न उजळलेली त्याची कांती. कितीतरी वेळ त्याला पाहण्यात रुहानी मग्न झाली होती. अत्यंत कमी, मोजक्या सामानाच्या त्या मोकळेपणात गर्दीत ते 'अभावाचं' अस्तित्व तीला भरभरून काहीतरी देत राहायचं. कदाचित हेच तीला हवं होतं, आणि तेच ती इतके दिवस शोधत असावी.

WhatsApp Image 2024-09-20 at 3.23.37 PM (2).jpeg

कुणाच्यातरी बाईकच्या Parking मधे येण्याच्या आवाजाने तीची विचारांची तंद्री भगा पावली. तीचं लक्ष काहीसं दूरवर तिनं ठेवलेल्या उभ्या तीच्या बॅगकडे गेलं. ती बॅगजवळ पोहोचली.जणू‌काही उरलंसुरलं छोटं अस्तित्व गोळा करून तीन तीच्या नव्या संसारासाठी जपून आणलं असावं . काय होतं त्यात? बरीचशी चुरगळलेली स्वप्नं , काही धूसर आराखडे, न पूर्ण झालेल्या आशा-आकांक्षा आणि अत्तराच्या कुपीत जपून ठेवल्यासारखा उरलं सूरलं प्रेम!

आयुष्यानं कुठली वळणं घ्यावी हे कधीच कुणाला, खुद्द आयुष्यालाटी सांगता येणं कठीण! अशाच एका वळणावर तो आला होता, आता मात्र त्याच वळणावरच्या त्याचा बाईकच्या आवाजानं आणि तीच्या जीवावरचं ओझं, भीती, दडपण क्षणात दूर झालं. तो भेटला. काय बोलावं? 'lets go' एव्हढच तो म्हणाला. तिनं एक आवंढा गिळून फक्त मान हलवली आणि बॅग घेऊन गाडीवर बसली. दोघं निघाले. मार्कच्या चेहऱ्यावर मात्र नेहमीसारखेच बिनधास्त भाव होता. जगरहाटीला न घाबरण्याचा, आलेल्या संकटावर कधीही, कशीही मात करू असा जबाबदार बेदरकारपणा. तीच्या लक्षात आलं कि नेमक्या याच तर गोष्टींनी तीच्याही इवल्याशा छोप्याशा पंखांना ताकत दिली होती! आसमंत ओलांडून उडण्याचं बळ...

WhatsApp Image 2024-09-20 at 3.23.37 PM (1).jpeg

आणि ते दोन पक्षी घरट्याच्या शोधात आपल्या संसारासह उडाले. काही वेळातच ते स्टेशनवर पोहोचले. त्याचा सोबत त्याचे काही 2-3 मित्र आणि तीच्या 2 मैत्रिणी निरोप दयायला आल्या होत्याच. मित्रांनीच त्यांची सोय काही दिवसांसाठी त्याच्या नातेवाइकाकडे केली होती. वातावरण निवळेपर्यंत काही दिवस तिकडेच राहायचं असा प्लॅन होता. सगळ्यांचा हृदय निरोप घेवून दोघेही गाडीत बसले. ती थोडी भावूक झाली होती. तीनं तीचं डोक हलकेच मार्कच्या खांदयावर टेकवलं. आणि समोर खिडकीत उभ्या मुलाला पाहता पाहता जणू ती स्वतःच्याच भविष्याची स्वप्नं रेखाटू लागली...

गाडीने वेग घेतला, तसं तिच्या स्वप्नचित्रांनीही वेग पकडला. त्याच गुंगीत तीला कधी झोप लागली हे तीचं तीलाच कळलं नाही. मार्क ने हलकेच तीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तोही नियतीने आखून दिलेल्या नव्या मागीचा प्रवासी होवून विचारांच्या गुंगीत झोपून गेला...

End.